भगवद्‌गीता
गीता हा एक अदभुत ग्रंथ आहे. कुणा मानवाने केलेले हे परमेश्वराचे स्तवन नाही, तर प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून उच्चारलेले हे मंत्र आहेत. हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेला हा उपदेश आहे. धनुर्धर अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि योगेश्वर श्रीकृष्णाने त्याला दिलेली समर्पक उत्तरे अशा संवादरूपात असल्याने गीता कठीण वाटत नाही. सहजसुलभ वाटते. अर्जुनाला केवळ युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी हे प्रबोधन केले नसून प्रत्येकाने स्वधर्मपालन कसे करावे हे ही परिणामकारक रीतीने समजावून सांगितले आहे. गीतेमध्ये १८ अध्याय असून ७०० श्लोक आहेत. प्रत्येक अध्यायात एक योग असे १८ प्रकारचे योग कथन केले आहेत. थोडक्यात मानवी जीवनाचे सार्थक करण्याविषयी यात मार्गदर्शन आहे. गीतेच्या केवळ उच्चारणाने देखील अनेक लाभ होतात. गीता पठण करणारी व्यक्ती, श्रवण करणारे, तसेच गीतापठण चालते अशा वास्तुवर देखील त्याचे सुपरिणाम दिसून येतात. आयुष्यातील संभ्रम दूर होऊन उत्तम निर्णय घेता येतात. अशा या मोहनाशिनी भगवदगीतेला शतशः वंदन!!
समर्थ रामदासस्वामी
स्वत: समर्थ असूनही “रामाचा दास” म्हणवून घेणारे १७ व्या शतकातील तेजस्वी महापुरुष! छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू! प्रपंच व परमार्थ यां दोहोंची सांगड कशी घालावी यां विषयी समाजाला प्रबोधन केले. आत्माराम, दासबोध, मनाचे श्लोक ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. भिक्षाटनाच्या निमित्ताने समाज परिक्षण केले. संपूर्ण भारतभर ११०० मठ स्थापन केले. तेथील मठाधिपती – महंत म्हणजे आदर्श व्यक्तिमत्वाचा उत्कृष्ट नमुना आहे. युवापिढी सशक्त, बलशाली व्हावी म्हणून जागोजागी व्यायामशाळा उभारल्या. बलोपासनेचे महत्व जनमानसावर बिंबवले.
आद्य शंकराचार्य
हिंदुत्वाचा अभिमानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघावे असे जगद्गुरु आद्य शंकराचार्य ईश्वरी कार्य करण्यासाठी ते अवतरलेले होते. वेदांत धर्माचा कोंडमारा झाला होता, अशा काळात संपूर्ण भारतभूमीमध्ये पदभ्रमण करून त्यांनी अद्वैतधर्म पुनरुज्जीवित केला. धर्मसेनेचे संरक्षण करण्यासाठी भारताच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले. धर्मध्वजा फडकत ठेवली. ते जागृत चैतन्य होते. देवमानव होते. त्यांच्या अनुपम अशा शारीरिक सौंदर्याला आत्मज्ञानामुळे दिव्यकांति लाभली होती. तेजस्वी डोळे व मधुर भाषा यामुळे त्यांचा प्रभाव ज्ञानीजनांवर तसेच जनसामान्यांवर सहजच पडत असे. अतिशय कुशाग्र बुद्धि असूनही वाणी सौम्य होती. त्यामुळेच भारतातील विभिन्न पंथ, संप्रदाय, जातिधर्माच्या लोकांच्या विचारातील त्रुटि दूर करून त्यांनी समन्वय निर्माण केला. त्यांनी हिंदूंना सुसंघटित केले. विद्वानांबरोबर शास्त्रार्थ केला. प्रस्थानत्रयीवरील भाष्य, प्रकरण ग्रंथ अशी विपुल ग्रंथरचना केली असली तरी सर्वसामान्यांना मात्र त्यांनी केलेल्या स्तोत्ररचना अधिक भावतात.
योगी अरविंद
वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत मातृभूमीपासून दूर लंडन मध्ये वास्तव्य होते. भारतीय भाषा, संस्कृती, योग परंपरा यांच्याशी थोडादेखील संबंध आलेला नसताना पुढे “महायोगी” म्हणून ओळखले गेलेले थोर महापुरुष म्हणजे श्री. अरविंद! इंग्रज सरकारच्या जुलूम जबरदस्तीचा निषेध म्हणून काही काळ क्रांतिकारकाची जहाल भूमिका स्वीकारली. पण पुढे दैवी आदेश स्वीकारून योगाचा, मौनाचा, तप:साधनेचा मार्ग आचरला. पॉंडिचरी येथे एकांतवासात चिंतन मनन केले. त्या तरल अवस्थेत जे ज्ञान प्राप्त झाले त्यातून जगाला “पूर्णयोगाची” देणगी दिली. “अभीप्सा”, “त्याग” व “शरणागती” ही परिवर्तन योगाची त्रिसूत्री आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात जनजागृती करणाऱ्या तुकडोजी महाराजांना त्यावेळचे राष्ट्रपती मा. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली. “देश सुधारायचा असेल तर आधी गाव सुधारले पाहिजे” या विचारधारणेतून त्यांनी मार्गदर्शक अशी “ग्रामगीता” लिहिली. सामान्यांचे उद्बोधन, समाजसुधारणा, देशभक्तिपर, खादीचा वापर अशा विविध विषयांवर त्यांनी भजने लिहिली आणि तितक्याच प्रभावी रीतीने सादर केली. “खंजिरीचे जादूगार” म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अमरावतीजवळ मोझरी येथे त्यांचा “गुरू कुंज” नावाचा आश्रम असून त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सर्वत्र आहेत.
गुरुदेव रानडे
तत्त्वज्ञानातील सिद्धांत समजावून घेताना त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ति झाली. लहान वयापासून उपजत बुद्धिमत्ता होतीच, त्यातच वयाच्या १५ व्या वर्षी ‘भाऊसाहेब उमदीकर’ या सद्गुरूंचा अनुग्रह लाभला. बौद्धिक सामर्थ्याला दैवाची जोड मिळाली आणि उत्तरोत्तर झपाट्याने प्रगति होत गेली. अलाहाबाद, पुणे, सांगली येथे विद्यादानाचे कार्य केले. वयाच्या २२ व्या वर्षापासून प्रकृति प्रतिकूल होती. दोनदा क्षयरोग होऊनसुद्धा, अतिशय कमी आहार घेऊन देखील त्यांनी केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर प्रभावी कर्तृत्व